
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या 268 कोटीच्या रुपयांच्या विकास निधीला स्थगिती दिली. या कामाला स्थगिती दिल्याच्या मुद्द्यावरून धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा पारा चांगलाच चढला होता.
त्यांनी भर बैठकीतच जिल्हाधिकारी कीर्ती किरण कुमार पुजारी व जिल्हा नियोजन अधिकारी यांना चांगलाच दम भरला. कोणाच्या सांगण्यावरून माझ्या कामात आडकाठी आणू नका, मला माझ्या जुन्या रूपात आणले तर तुमची अडचण होईल, असा इशाराच खासदार राजेनिंबाळकर यांनी प्रशासनाला दिला.
धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या 268 कोटीच्या रुपयांच्या विकास निधीला स्थगिती दिली अन् त्याच कामाला स्थगिती दिल्याच्या मुद्द्यावरून जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. तुम्ही जे नियम मला दाखवत आहेत. त्या नियमानुसार तुम्हाला वागावे लागणार आहे. कायद्याच्या एकदम टोकावर जर तुम्ही बोट ठेऊन चालणार असाल तर मी पण तुमच्याप्रमाणे नियमावर बोट ठेवूनच चालेल, असा इशारा देखील यावेळी खासदार राजेनिंबाळकर यांनी दिला.
जिल्ह्ह्याची डीपीडीसीची बैठक घेतली. या बैठकीत सर्व जणांनी मिळूनच निधीचे वाटप केले. त्यानंतरच 268 कोटीच्या रुपयांच्या विकास निधीला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर अचानक जर या निधीला स्थगिती दिली जात असेल तर याला काय अर्थ आहे. या गोष्टीमुळे येथील वातावरण खराब होईल. शेवटी तुम्हाला जिल्हयाचा विकास करायचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या ठिकाणी काही माणसे ज्या मानसिकतेची आहेत, त्या मानसिकतेच्या आम्ही नाहीत. आम्हाला फक्त काम करायचे आहे, असे देखील खासदार निंबाळकर यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासोबत धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.