
बड्या नेत्यांचा शिवसेना प्रवेश…
लोणावळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला असून पक्षांतर्गत असलेल्या गटातटाच्या राजकारणाला कंटाळून अनेकांनी शिवसेना एकनाथ शिंदेंच्या पक्षात आज प्रवेश केला आहे.
मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थित हा शिवसैनिकांचा प्रवेश करून घेण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोणावळा शहरप्रमुख प्रकाश पाठारे, दुसरे उपशहर प्रमुख विजय आखाडे, माजी नगरसेवक आणि महिला आघाडी अध्यक्ष कल्पना आखाडे, माजी नगरसेविका सिंधुताई परदेशी यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पुण्यात मोठा झटका मिळाला होता. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले होते. पक्षातील वरिष्ठ लक्ष देत नसल्याच्या कारणावरून शिवसेना ठाकरे गटामध्ये हे मोठं खिंडार पडलं. पुणे शहरातील ३२ महिला पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला असून या महिला पदाधिकारी एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचं सांगितले जात होतं. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे आणि अदिज पवार गटात प्रवेश केला होता.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सुरुवातीला पाच माजी नगरसेवकांनी पक्षाची साथ सोडली. त्यानंतरच्या काळात अनेक पदाधिकारी ठाकरे सेनेचा राजीनामा देत इतर पक्षांमध्ये गेले. त्यापाठोपाठ आज ठाकरे गटातील ३२ महिला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता माजी नगरसेवक शहरप्रमुखांसह अने पदाधिकारी तथा शिवसैनिकांनी ठाकरेंची साथ सोडली आहे.