
महायुतीचे काही ठरलेले प्रोटोकॉल असूनही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये विरोधकांना घेतले जात असल्याबद्दल भाजप नेते ना. गिरीश महाजन यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांना टोला लगावत म्हटले की, त्यांनी प्रवेश दिला, मग आम्हालाही मार्ग मोकळा झाला.
जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एमआरआय मशीनचे उद्घाटन करताना गिरीश महाजन माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, महायुती म्हणून काही प्रोटोकॉल ठरलेले होते. जे आमच्या विरोधात लढले, त्यांना युतीत घेऊ नये, असं ठरलेलं आहे. मात्र अजित पवारांनी तसा विचार केला नाही. त्यांनी विरोधात लढलेल्यांनाही पक्षात घेतले आहे. त्यामुळे काही ठिकाणी आम्हालाही आता मार्ग मोकळा झाला आहे.
महाजन पुढे म्हणाले, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील अनेक कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत, आम्ही त्यांचे स्वागत करतो. पण अजित पवारांनी कोणाशीही सल्लामसलत न करता त्यांना प्रवेश दिला आहे. आमच्याकडे येण्यासाठी इच्छुक असलेल्यांशी चर्चा सुरू होती. मात्र गुलाबराव पाटील यांच्या नकारामुळे आम्ही त्यांना घेतले नाही.
राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा जिल्हा नियोजन समिती (DPDC) वर परिणाम होऊ शकतो का, या प्रश्नावर गिरीश महाजन म्हणाले, डीपीडीसीचे मालक म्हणजे पालकमंत्री असतो. अजित पवारांना वाटले तर त्यांनी त्यांच्या लोकांना निधी देऊ शकतात. मात्र महायुती ही मित्रपक्षांची आहे, त्यामुळे सर्व निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील.
लाडक्या बहिणीसाठी निधी वळवण्यात येतोय या चर्चेबाबत महाजन म्हणाले, असे कोणतेही पैसे वळवले गेलेले नाहीत. आमच्याकडे पुरेसा निधी आहे. सर्व योजनांचे योग्य नियोजन झाले आहे. कोणाचाही निधी कोणाला दिला जाणार नाही. सर्वांना वेळेवर निधी दिला जाईल.
अजित पवार मुख्यमंत्री होतील का, या प्रश्नावर त्यांनी म्हणाले, सगळ्यांनाच मुख्यमंत्री व्हावं वाटतं. आपण अनेकदा बॅनर पाहिले आहेत – कोणी पंतप्रधान, कोणी मुख्यमंत्री व्हावे अशी आशा व्यक्त करतं. पण निर्णय घेणारे राऊत कोण आहेत ?
अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, या विधानावर त्यांनी मिश्किलपणे प्रतिक्रिया देताना म्हटले, त्यांचं डोकं तपासायला हवं. पहिला रुग्ण म्हणून त्यांची एमआरआय करावी लागेल. त्यांच्या बोलण्याला काही अर्थही नाही आणि किंमतही नाही.