
नाना पाटेकरांकडून शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव…
राज्याच्या राजकारणात खूप कमी मंडळी आहेत ज्यांच्यावर कोणताही ठपका नाही, त्यापैकी एक म्हणजे एकनाथ शिंदे,’ असं म्हणत अभिनेते नाना पाटेकर यांनी एकनाथ शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव केला.
काही मित्र असे असतात ज्यांच्याकडे पाहून समाधान वाटतं, एकनाथ शिंदे हे त्यापैकीच एक आहेत’ असंही नाना यावेळी म्हणाले. नाम फाऊंडेशन, टाटा मोटर्स आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने कोयना धरण परिसरात ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही योजना राबवली जात आहे. त्याचा शुभारंभ हा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी नाना पाटेकर बोलत होते.
नाना पाटेकर म्हणाले की, ‘एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्यापासून ओळखत आहे. आमची मैत्री जुनी आहे, मी त्याच्यांकडे काही मागत नाही. काही राजकीय मंडळी आहेत ज्यांच्यावर कोणतेही ठपके नाहीत, त्यांच्यापैकी एक म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. शिंदेंनी मुख्यमंत्रिपद भूषवलं, पण कुणीही त्याच्याकडे बोट दाखवू शकत नाही. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांना सुद्धा मी जवळून ओळखतो. त्यांचे सुद्धा काम चांगले आहे.
नाना पाटेकर पुढे म्हणाले की, ‘नाम फाउंडेशनचा टाटा समूह आणि राज्य सरकारसोबत करार झाल्यानं आमचं काम अधिक सोयीचं झालं आहे. धरणातून गाळ काढल्यास आणि तो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वापरल्यास शेतीची सुपिकता वाढते. माझ्या खडकवासल्यातील शेतीमध्ये याचा वापर केला. त्यामुळे उत्पादनात दुप्पट वाढ झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे पाण्याचा साठाही वाढतो आणि शेतकऱ्यांचं उत्पादनही वाढेल. कोयना धरणातील गाळ काढण्याचं काम पुढच्या वर्षी अधिक प्रमाणात सुरू कराव’, असं आवाहन नाना पाटेकर यांनी केलं.