
फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात…
हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुकांचं राजकारण आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर टीका केली आहे. राज्यात मराठी भाषेच्या सक्तीवरून सुरु असलेल्या वादात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
हिंदी भाषा सक्तीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आक्रमक भूमिक घेतली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. राज ठाकरेंच्या री ला री ओढच राज्य शासनावर उद्धव यांनी टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, ठाकरेंनी घेतलेल्या या भूमिकेवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका मांडली आहे.
फडणवीस म्हणाले, महापालिका निवडणुका नसत्या, तर कदाचित आज विरोध झाला नसता. राज ठाकरे आणि आमची भूमिका वेगळी असली तरी ठाकरेंची भूमिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीयच वाटते. ते जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी स्वतः त्रिभाषा धोरणावर आधारित माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारला होता. आता त्याच अहवालावर आक्षेप घेत आहेत, याचा अर्थ स्पष्ट आहे. हे राजकीय भूमिकांमध्ये बदल आहे.
हिंदी सक्ती नाही, पर्यायी भाषा म्हणून समावेश
तसेच यावेळी, महाराष्ट्रात हिंदी सक्ती नाही, ती एक पर्यायी भाषा आहे. असदेखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. “राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सूत्र आहे – मराठी, इंग्रजी आणि एक अन्य भारतीय भाषा. विद्यार्थ्यांच्या मेंदूच्या विकासाच्या दृष्टीने लहान वयात भाषा शिकवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तीन भाषा शिकणं ही गरज आहे, सक्ती नव्हे, असं त्यांनी सांगितले.