
दैनिक चालु वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी पंडित चौगुले
कोल्हापूर
असाक्षर व्यक्तींना साक्षर बनवून येत्या दोन वर्षात कोल्हापूर जिल्हा 100 टक्के साक्षर जिल्हा बनवण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय नियामक समितीची बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी शिक्षणाधिकारी योजना एकनाथ आंबोकर, सांख्यिकी विभागाच्या उपसंचालक सीमा अर्दाळकर, माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी रवींद्र चौगुले, प्राथमिक शिक्षण विभागाचे उदय सरनाईक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण परिषदेचे अधिव्याख्याता श्री वांडरे, श्रीमती अश्विनी पाटील, प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार तसेच अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, नवभारत साक्षरता कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करा. येत्या 15 जुलै पर्यंत असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण करुन असाक्षरांची नोंदणी करुन घ्या. यानंतर स्वयंसेवक व असाक्षर यांची जोडणी करा. जिल्ह्यातील असाक्षरांना साक्षर बनवण्यासाठी लवकरात लवकर साक्षरता वर्ग सुरु करा. या वर्गांना वेळोवेळी भेटी देऊन पाहणी करा. सप्टेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या या परीक्षेत जिल्ह्यातील शंभर टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करा. झोपडपट्टी भाग, जंगल परिसर, धनगरवाडे येथील साक्षर व असाक्षर नागरिकांची लोकसंख्या विचारात घेऊन त्यानुसार साक्षरता वर्गाचे नियोजन करा. या वर्गांसाठी स्वयंसेवक म्हणून इच्छुक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संधी द्या, असेही त्यांनी सांगितले.
शिक्षणाधिकारी योजना एकनाथ आंबोकर यांनी उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची माहिती देऊन हा कार्यक्रम राबवण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली.