दैनिक चालु वार्ता परळी वैजनाथ-
परळी – गंगाखेड रस्त्याचे रखडलेले काम तातडीने सुरू करावे यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दाउतपुरचे सरपंच श्रीकांत (कांताभाऊ) फड यांनी देताच प्रशासन खडबडून जागे झाले आणि रखडलेले काम सुरू केले. मागणीला यश आल्याने सरपंच श्रीकांत (कांताभाऊ) फड यांनी दि. 30 जुन रोजीचे रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित केले असुन नागरीकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न सोडल्याबद्दल प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
परळी वैजनाथ ते गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या काही दिवसांपासून बंद होते. यामुळे नागरिक, वाहनधारक, गावकऱ्यांची गैरसोय होत होती. तसेच रूग्णांची ने-आण करण्यासाठीही वाहन चालकाला तारेवरची कसरत करावी लागत होती. मागील वर्षी पुलाचे काम अर्धवट असल्याने सरस्वती नदीला आलेल्या पुरामुळे २ ते ३ वेळा २ दिवस शहराचा संपर्क तुटला होता. याबाबत वेळोवेळी सांगुनही रस्ता आणि पुलाचे काम केले जात नसल्याने दाउतपुरचे सरपंच श्रीकांत (कांताभाऊ) फड यांनी सदरचे काम तात्काळ पुर्ण करण्यात यावे अन्यथा दि. ३० जुन २०२५ रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, विभाग लातूर, उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, उपविभाग परळी वैजनाथ यांना दिला होता. याबाबत तहसिलदार व्यंकटेश मुंडे, संबंधित विभागाचे अधिकारी व दाउतपुरचे सरपंच श्रीकांत (कांताभाऊ) फड आणि सहकारी यांच्यात चर्चा झाली. सदरील रस्त्याचे तातडीने सुरू करण्यात आले असून पुलाचे कामही लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधितांनी दिले. ईटके कॉर्नर येथीलही कामास प्रत्यक्षात सुरू करण्यात आले आहे.
शक्तीकुंज वसाहत गेटजवळ शाळेसाठी विद्यार्थी मोठय़ा संख्येने ये – जा करीत असतात येथे गतीरोधक नसल्याने अपघाताची शक्यता असल्याने तिथे गतिरोधक बसण्याची मागणी सरपंच श्रीकांत फड यांनी केली होती. याबाबतही तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. या भागातील जनतेच्या अतिशय जिव्हाळ्याच्या सर्वच प्रश्नावर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन अर्धवट काम तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आणि काही कामास प्रत्यक्षात सुरुवात केली. त्यामुळे दाऊदपूरचे सरपंच श्रीकांत (कांताभाऊ) फड यांनी उद्या सोमवार दिनांक 30 जून रोजी करण्यात येणारे रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान केलेल्या मागण्यांची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात केल्याबद्दल श्रीकांत फड यांनी संबंधित विभाग आणि प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.