
तब्बल तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यास इच्छुक असलेले कार्यकर्ते, नेते निवडणुका जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत पदाधिकाऱ्यांना स्पष्ट संकेत दिले असून निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्या दरम्यान त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील प्रत्येक प्रभागांमध्ये तयारी करण्याची सूचना पदाधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे वेळ पडल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल सुरू असल्याचे बोलले जात आहे.
या बैठकीत अजित पवार यांनी स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका दोन टप्प्यांत होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्या आणि नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका होतील. त्यानंतर महापालिका निवडणूक नोव्हेंबर किंवा डिसेंबर अखेरीस लागण्याची शक्यता आहे, असे सांगून दिवाळीनंतरच महापालिका निवडणूक होईल, असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी अजित पवार यांनी रविवारी बैठकीत पदाधिकाऱ्यांनी दिले.
पदाधिकाऱ्यांना सूचना करताना पवार म्हणाले, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार आपल्याला पक्ष संघटन आणखी बळकट करण्यासाठी पाच महिन्यांचा अवधी मिळणार आहे. या कालावधीत पक्ष संघटन ताकत वाढवण्यासाठी कार्यक्रमांचा आयोजन करण्यावर भर द्या. प्रत्येक प्रभागातील विभागातील आणि मतदारसंघातील कार्यकर्त्यांना एकत्रित करून त्यांच्याशी संवाद साधण्याच्या सूचना अजित पवारांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
…तर निवडणुकीत यश मिळेल
प्रभाग व बूथ स्तरावर पक्षाची घडी बसवण्यासाठी ग्राउंड लेव्हलवर जाऊन नियोजन करावे. निवडणूक वेळेवर लागेल, त्यामुळे कोणतीही गडबड न करता नियोजनपूर्वक आणि एकत्रितरीत्या काम करणे गरजेचे आहे. पक्षात जुने-नवे कार्यकर्ते एकत्र येऊन काम केले तर तर निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळेल, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मी स्वतः लक्ष घालणार असून कशा पद्धतीने संघटनात्मक कामगिरी झाली आहे. याबाबत ऑगस्टमध्ये आढावा बैठक घेणार असल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले आहे.