
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी- सुरेश ज्ञा. दवणे
जालना (मंठा)-
(संभाजी ब्रिगेड, मंठा व सर्व समविचारी संघटना,समाज बांधव व विविध राजकीय पक्ष यांच्याकडून तहसीलदाराद्वारे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे आक्रमक इशारा)
१३ जुलै २०२५ रोजी अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय नेते प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर भाजपशी संबंधित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दीपक काटे याने साथीदारांसह शाईफेक करत भ्याड हल्ला केला. या घटनेचा मंठा तालुक्यात तीव्र निषेध होत असून, आज संभाजी ब्रिगेड, मंठा शाखा आणि समविचारी संघटनांच्या वतीने दी. १५जुलै रोजी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन सादर करून तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
प्रवीण दादा यांच्यावर हल्ला म्हणजे…
“समता, बंधुता, आणि वैचारिक आंदोलनावर हल्ला!”
संभाजी ब्रिगेडच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रवीण दादा गायकवाड हे बुद्ध, शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम गेली अनेक वर्षे करत आहेत. त्यांनी अनेक बहुजन तरुणांना स्वावलंबी व उद्योजक बनवले आहे. अशा व्यक्तीवर सराईत गुन्हेगारांकडून हल्ला होणे म्हणजे वैचारिक क्रांतीला गप्प करण्याचा कट असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
गुन्हेगार कोण? पक्ष पदाधिकारी!
हल्लेखोर दीपक काटे हा केवळ गुन्हेगार नसून, भाजपच्या एका शाखेचा प्रदेश सचिव असल्याची माहितीही निवेदनात नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे फक्त पोलिस कारवाई नव्हे, तर त्याला पक्षातून हकालपट्टी करावी, अशी जोरदार मागणी ब्रिगेडने केली.
संभाजी ब्रिगेडचा स्पष्ट इशारा:-
“जर कारवाई झाली नाही, तर ‘जशास तसे’ उत्तर देण्यास आम्ही मागे हटणार नाही. कायदा-सुव्यवस्थेच्या परिणामांना शासन जबाबदार राहील.”
असा ठाम इशारा देत संभाजी ब्रिगेड, मंठा, तसेच समविचारी संघटना, समाजबांधव व विविध राजकीय-सामाजिक पक्षांच्या वतीने हे निवेदन तहसील कार्यालयात सादर करण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे ता.अध्यक्ष बाळासाहेब खवने,प्रा.डॉ.पांडुरंग नवल,सुभाष जाधव,शेख ऐजाज,आसाराम झोल,एकनाथ काकडे,शरद बाहेकर,शरद घारे,प्रल्हाद शिरसाट, एकनाथ जाधव, अशोक हिवाळे,योगेश वायाळ, राजेश काळे,कृष्णा पवार,विशाल देशमुख,धोंडीराम घोरसड, शिवाजी शेवाळे,ताहीर बागवान,दिनकर बागल, गौतम मगर,केशव खराबे,नारायण ढाकरगे,भारत उघडे आदी उपस्थित होते.