
भाजप कोंडीत सापडणार !
राज्यभरात जिल्हा परिषद निवडणुकीचे चित्र आरक्षण जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होईल. नाशिक जिल्ह्यात मात्र वेगळेच चित्र आहे. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षापुढे भाजपचा टिकाव लागण्याची चिन्हे नाहीत.
त्यामुळे भाजपच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे.
नाशिक जिल्ह्यात १५ पैकी १४ विधानसभेच्या जागांवर महायुतीचे वर्चस्व आहे. ‘एमआयएम’ पक्षाचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल हे मालेगाव शहराचे आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व गटांमध्ये महायुतीचे सत्ताधारी आमदार आहेत. मात्र अशी स्थिती असली तरी भारतीय जनता पक्षाची अवस्था फारशी चांगली नाही. हा पक्ष जागा वाटपाच्या चर्चेतच गारद होण्याची चिन्हे आहेत.
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे छगन भुजबळ माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ हे तीन मंत्री आहेत. याशिवाय नितीन पवार, हिरामण खोसकर, सरोज आहिरे आणि दिलीप बनकर हे चार आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राजकीय क्षमता आणि सत्तेपुढे महायुतीतील अन्य पक्षांचे फारसे काही धकेल असे सध्याचे चित्र नाही. यामध्ये भारतीय जनता पक्षाची सर्वाधिक कोंडी होईल अशी स्थिती आहे.
नाशिक जिल्ह्यात ७४ जिल्हा परिषद गट आहेत. त्यामध्ये मंत्री भुजबळ, कोकाटे आणि झिरवाळ यांच्या मतदारसंघात २२ जिल्हा परिषद गट आहेत. अजित पवार पक्षाच्या अन्य चार आमदारांच्या मतदारसंघात २५ जिल्हा परिषद गट आहेत. ७४ पैकी ४७ गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पक्षाचे मंत्री आणि आमदारांच्या कार्यक्षेत्रात आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत सामान्यता ग्रामपंचायत आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद गटात सत्ताधारी आमदारांचाच प्रभाव दिसून येतो.
नाशिक जिल्हा परिषद निवडणुकीत गटांच्या आणि गणांचे आरक्षण कसेही असले तरी उमेदवार आणि उमेदवारा मागे राजकीय शक्ती कोणाची याला महत्त्व असते. या स्थितीत निवडणुकीआधीच नाशिक जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे प्राबल्य स्पष्ट झाले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रितपणे सामोरे जाईल असे वारंवार सांगितले जाते. महायुती एकत्र राहिल्यास नाशिक जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या दोन आमदारांच्या कार्यक्षेत्र अवघे १५ तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या दोन आमदारांच्या मतदारसंघात १२ जिल्हा परिषद गट आहेत. विशेष म्हणजे शिवसेना शिंदे पक्षाच्या आमदार सुहास कांदे आणि मंत्री दादा भुसे यांना महायुतीच्याच माजी खासदार समीर भुजबळ आणि नुकतेच भाजप पक्षात प्रवेश केलेल्या हिरे गटाचे आव्हान आहे.
गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत दादा भुसे यांच्या मतदारसंघात मंत्री असूनही जिल्हा परिषदेत फारसा करिष्मा दाखवू शकले नव्हते. काय होते? याची उत्सुकता कायम आहे. त्या स्थितीत महायुती एकत्र लढल्यास सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपची चर्चेच्या पातळीवरच राष्ट्रवादी काँग्रेस दमछाक करील अशी स्थिती आहे.