दैनिक चालु वार्ता ठाणे ग्रामीण प्रतिनिधी -विकी जाधव
—————————–
शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये सामान्य नागरिकांनी आपल्या मोबाईलद्वारे फोटो किंवा व्हिडीओ रेकॉर्डिंग करू नये असे सांगितले जात असल्याच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांनी अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश पाठवले आहेत.
ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचलित माहिती अधिकार नागरिक समूहाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक पाचपुते यांनी याबाबत १० जुलै २०२५ रोजी विभागीय आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती.
या तक्रारीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील अनेक सरकारी व निमसरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांना मोबाईलने व्हिडीओ/फोटो घेण्यास मज्जाव केला जात आहे. यामुळे नागरिकांचा माहितीचा अधिकार, पारदर्शकतेचा हक्क आणि प्रशासकीय जबाबदारी यावर आघात होतो, असे पाचपुते यांनी निदर्शनास आणून दिले.
त्यावर कारवाई करत विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांनी दिनांक ११ जुलै २०२५ रोजी अधिकृत पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले.
या पत्रात स्पष्ट सांगण्यात आले आहे की,
> “नागरिकांना कार्यालयीन व्यवहारात पारदर्शकता राखण्यासाठी मोबाईलद्वारे रेकॉर्डिंग किंवा छायाचित्र घेण्याचा हक्क आहे. त्यामुळे संबंधित कार्यालयांनी असा मज्जाव करू नये.”
लोकशाही प्रक्रियेचा विजय – दीपक पाचपुते
या अनुषंगाने बोलताना दीपक पाचपुते म्हणाले,
> “हे फक्त फोटो काढण्याचा विषय नाही, हा नागरिकांच्या हक्कांचा मुद्दा आहे. विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अधिकार अधिक मजबूत होतील आणि प्रशासन अधिक जबाबदार बनेल.”