
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी- तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण) : दै. चालू वार्ताचे संपादक डी.एस. लोखंडे पाटील यांनी आज पैठण शहरास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. लोखंडे पाटील यांनी या पवित्र भूमीला आणि तिच्या समृद्ध परंपरेला नमन केले.
याप्रसंगी बोलताना डी.एस. लोखंडे पाटील यांनी आपल्या मनोगतातून संत एकनाथ महाराजांच्या अलौकिक कार्याचा गौरव केला. “संत एकनाथ महाराजांनी समाजप्रबोधनाचे मोठे कार्य केले. त्यांचे अभंग, भारुडे आणि विविध रचनांमधून त्यांनी समाजाला समतेचा, भक्तीचा आणि माणुसकीचा संदेश दिला. त्यांनी अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अथक प्रयत्न केले, ज्यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाला एक नवी दिशा मिळाली,” असे उद्गार त्यांनी काढले.
पुढे बोलताना, लोखंडे पाटील यांनी पैठण नगरीच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण केले. ते म्हणाले, “पैठण ही फक्त एक ऐतिहासिक नगरी नाही, तर ती संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या शहराला प्राचीन काळापासून मोठे महत्त्व लाभले आहे. सातवाहन राजांची राजधानी राहिलेल्या या पैठणमध्ये अनेक संत-महंतांनी तपश्चर्या केली आणि ज्ञानदानाचे कार्य केले.”
लोखंडे पाटील यांनी पैठणच्या अध्यात्मिक वारशासोबतच तिच्या सांस्कृतिक वैभवाचीही आठवण करून दिली. “पैठणी साडीसारख्या येथील कलाकुसरीने पैठणचे नाव जगभरात नेले आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे,” असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. त्यांच्या या भेटीमुळे आणि व्यक्त केलेल्या विचारांमुळे पैठणच्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाला आणखी एकदा उजाळा मिळाला.
या भेटीदरम्यान, नाथ संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. संस्थानचे विश्वस्त दादा बारे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळ तसेच स्थानिक मान्यवरांनी त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. संपादक लोखंडे पाटील यांनी संस्थानच्या अन्नछत्रालयास भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती घेतली. त्यांनी अन्नछत्र व्यवस्थापन, स्वयंपाकघरातील सुविधा यांची पाहणी केली व प्रशंसा व्यक्त केली.
यानंतर, त्यांनी शहरातील राजलक्ष्मी हॉटेलचे मालक व प्रसिद्ध व्यापारी श्याम पंजवानी आणि ज्ञानसागर कंप्युटर्सचे संचालक नितीन मोरे यांच्याशी पैठण शहरातील विविध बाबींवर सविस्तर चर्चा केली. यावेळी ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि पर्यटनदृष्ट्या असलेल्या महत्त्वाचा ठेवा, तसेच प्रसारमाध्यमांची भूमिका या विषयावरही विचारमंथन झाले.
संपादक लोखंडे पाटील यांनी भेटीअंती पैठणवासीयांच्या प्रेमळ स्वागताबद्दल कृतज्ञता व्यक्त करत दै. चालू वार्ता कडून जनतेपर्यंत सकारात्मक, सत्य आणि सामाजिक जाणीव जागवणारी पत्रकारिता सातत्याने पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला.
या विशेष भेटीत अॅड. गुणाजी मोरे, श्याम पंजवानी, नितीन मोरे, दै. चालू वार्ताचे पैठण प्रतिनिधी तुषार नाटकर, गजानन झोल, अन्नछत्रालय व्यवस्थापक जयराम फासाटे, कैलास बोबडे, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.