दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी -सुरेश ज्ञा. दवणे
जालना (मंठा )
केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा व दिव्यांग योजनेतील लाभार्थ्यांसाठी आता डिजिटल जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक करण्यात आले असून, संबंधित लाभार्थ्यांनी यास अनिवार्यपणे पालन करावे, असे आदेश राज्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार कल्याण काळदाते यांनी दिली. या संदर्भात ०८ जुलै २०२५ रोजी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लाभार्थ्यांनी ऑनलाईन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पार पडणार असून, मोबाईल फोनच्या माध्यमातूनच घरबसल्या ओळख पडताळणी करून प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक व ई-मेल टाकून डिव्हाइस रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर फेस ऑथेंटिकेशनद्वारे ओळख पडताळणी करावी. ओळख पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आपला उद्देश पुर्ण होईल. प्रमाणपत्र न सादर केल्यास लाभार्थ्यांचा निवृत्तिवेतन/निधी वितरण थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया जवळच्या सेवा केंद्रातून किंवा आपल्या मोबाईलवरून करता येणार आहे. दरम्यान, तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी त्वरित डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करून आपला हक्काचा लाभसुरळीत सुरू ठेवावा, असे आवाहन मंठा तहसीलदार
कल्याण काळदाते यांनी केले आहे. लाभार्थ्यांना काही अडचण आल्यास तहसील कार्यालयात संपर्क साधावा