
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :“कर्म वैयक्तिक जीवनाबरोबरच सार्वजनिक जीवनही सुजलाम–सुफलाम बनवते. महात्मा बसवेश्वरांसह सर्व संतांनी कर्माचा सिद्धांत मांडला आहे. कामातून जो आनंद मिळतो, त्याची तुलना कशाशीही करता येत नाही. खऱ्या अर्थाने कर्म हीच पूजा असून तेच जगण्याचा अविभाज्य भाग बनले पाहिजे,” असे विचार संभाजीराव केंद्रे महाविद्यालय, जळकोटचे प्राचार्य डॉ. बी. टी. लहाने यांनी व्यक्त केले.
उदगीर येथे धर्मवीर संग्रामप्पा शेटकार यांच्या ८६व्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित ९१व्या वचन सप्ताहातील चौथे पुष्प शुक्रवार, दि. ८ ऑगस्ट रोजी डॉ. लहाने यांनी गुंफले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष दुबळगुंडे यांनी भूषविले. माजी उपनगराध्यक्ष शिवराज पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वर व धर्मवीर संग्रामप्पा शेटकार यांच्या प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर शिवाजी स्वामी यांनी भावपूर्ण बसवगीत सादर केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय अॅड. महेश मळगे यांनी करून दिला.
अध्यक्षीय समारोपात संतोष दुबळगुंडे म्हणाले, “महात्मा बसवेश्वरांचे जीवन जगणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. त्यांची संसद ही समतावादी होती आणि अनुभवमंटपात ‘कायक’ (कर्म) शिवाय प्रवेश नव्हता. आजही त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन कार्य केले पाहिजे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुप्रसाद पांढरे यांनी केले, तर आभार संग्राम शाळेचे पर्यवेक्षक श्री. बिरादार यांनी मानले.