दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी/सुरेश ज्ञा. दवणे
जालना (मंठा )
तालुक्यातील आकणी येथील जिल्हा परिषद शाळेत शनिवार, दि. १० जानेवारी रोजी आजी–माजी विद्यार्थी तसेच पालकांचा संयुक्त मेळावा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांसह माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या मेळाव्यास गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत शाळेसाठी निधी संकलनातही भरभरून प्रतिसाद दिला. सरपंच तथा उद्योगपती कल्याणराव बोराडे यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ती मदत सातत्याने केली जाईल, अशी शाश्वती मुख्याध्यापक कैलास उबाळे यांना दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कल्याणराव बोराडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षणाधिकारी गोविंद चव्हाण, विस्तार अधिकारी के. जी. राठोड, सोनाबापू बोराडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लखन मोरे व समितीचे सर्व सदस्य, तसेच शिक्षण विभागातील अनेक शिक्षणप्रेमी शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश लोमटे यांनी केले, तर मुख्याध्यापक कैलास उबाळे यांनी प्रास्ताविक केले. यानंतर गट शिक्षणाधिकारी गोविंद चव्हाण, मुख्य मार्गदर्शक व व्याख्याते सेवानिवृत्त प्राचार्य रंगनाथ खेडेकर, विस्तार अधिकारी के. जी. राठोड, सरपंच कल्याणराव बोराडे तसेच माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व अधोरेखित करत, जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थीच पुढे जीवनात यशस्वी ठरत असल्याचे अनुभव कथन करण्यात आले. मुख्याध्यापक कैलास उबाळे यांनी अवघ्या सहा महिन्यांत शाळेचा चेहरामोहरा बदलून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याबद्दल गावकऱ्यांसह मान्यवरांनी त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, पालकांनी इंग्रजी माध्यमाच्या आकर्षणाला बळी न पडता जिल्हा परिषद शाळेतच आपल्या पाल्यांचे शिक्षण द्यावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक विठ्ठल तरवटे, शिक्षिका स्वाती बनसोडे, अमोल लोमटे व रामेश्वर मुसळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास आजी–माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
