दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
शनिवार, दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी ठरावीक वेळेत, देगलूर येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग यांच्या नूतन न्यायालयीन इमारतीचा उद्घाटन समारंभ मोठ्या शिस्तबद्ध, सुसंस्कृत व सन्मानपूर्वक वातावरणात पार पडला. हा सोहळा देगलूरच्या न्यायइतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीपकुमार सी. मोरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश . सुनील ग. वेदपाठक होते, तर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती . नीरज पी. धोटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली.
सन 1920 पासून न्यायदानाची परंपरा जपणाऱ्या जुन्या न्यायालयीन इमारतीच्या जागेवर गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेले बांधकाम अखेर पूर्णत्वास गेले. आधुनिक तंत्रज्ञान, प्रशस्त न्यायालय कक्ष, अभिवक्ता संघासाठी स्वतंत्र व सुसज्ज बार असोसिएशन, तसेच नागरिकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांनी युक्त अशी ही भव्य इमारत आता न्यायसेवेसाठी खुली करण्यात आली आहे.
या ऐतिहासिक कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर राघवेंद्र नरहरराव देव आणि अॅड. विरेंद्र नागनाथ पाटील, अध्यक्ष, अभिवक्ता संघ देगलूर यांनी कार्यक्रमाच्या नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा सोहळा नियोजित वेळेत व यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नांदेड येथील दिवाणी न्यायाधीश इंदूरकर यांनी अत्यंत प्रभावी, संयत व मुग्ध भाषेत केले, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.
यावेळी देगलूर बिलोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार जितेश अंतापुरकर ,उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, पोलीस निरीक्षक मारुती मुंडे, विविध सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, वकील आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितीतूनच या नूतन न्यायालयीन इमारतीचे सामाजिक व न्यायालयीन महत्त्व अधोरेखित झाले.
न्यायालयीन इमारत म्हणजे केवळ भौतिक रचना नसून, ती न्याय, संविधान व लोकशाही मूल्यांची दृढ प्रतिमा असते. देगलूरमध्ये उभी राहिलेली ही नूतन न्यायालयीन इमारत पुढील अनेक दशकांपर्यंत न्यायाच्या प्रकाशाचा दीपस्तंभ ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
