दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा औंध प्रतिनिधी -निहाल मणेर
औंध:श्री यमाई देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर राजयोग फाउंडेशनचे अमर देशमुख व हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संचालक अनिल जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित औंध हिल मॅरेथॉन स्पर्धा उत्साह, रोमांच आणि निसर्गसौंदर्याचा मनमोहक संगम ठरली. पहाटेची गुलाबी थंडी, अंगावर शहारे आणणारे हलकेसे धुके आणि डोंगररांगांमधून वाहणारी थंड हवा अनुभवत तब्बल ४५० धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उद्घाटन गायत्रीदेवी पंत प्रतिनिधी चारुशीलाराजे यांच्या हस्ते करण्यात आले. हिरवा झेंडा दाखवताच सकाळी सहा वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. धुक्याच्या सरीतून धावपटू निसर्गाशी एकरूप होत मार्गस्थ झाले.
ही मॅरेथॉन श्री यमाई स्टेडियम, औंध येथून सुरू होऊन ग्रामपंचायत चौक, हायस्कुल चौक, गणेश खिंड, वरुड येथील नूतन तलाव असा निसर्गरम्य मार्ग पार करत पुन्हा यमाई स्टेडियम येथे समाप्त झाली. चढ-उतार, वळणदार रस्ते आणि रम्य परिसरामुळे ही स्पर्धा धावपटूंसाठी आव्हानात्मक ठरली. ११ किलोमीटर अंतरासाठी विविध वयोगटांत स्पर्धा पार पडली. महिला, पुरुष, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने व धाडसाने सहभाग घेतला. धोकादायक मार्ग असूनही उत्साह कायम ठेवत धावपटूंनी निसर्गाचा आनंद घेत स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली.
विजेते स्पर्धक –
11 किमी (18 te 34 वयोगट पुरुष): किशोर नारायण शिंदे (प्रथम), ऋषिकेश संजय सपकाळ (द्वितीय), यशवंत दत्ताजी हिरवे (तृतीय)
11 किमी (35 ते 49 वयोगट पुरुष): मल्लिकार्जुन पारडे (प्रथम), पवन अवधेश प्रजापती (द्वितीय), श्रीनिवास पांडे (तृतीय)
11 किमी (50 पासून पुढे वयोगट पुरुष): रमेश चिविलकर (प्रथम), रवींद्र जगदाळे (द्वितीय), पांडुरंग तानाजी पाटील (तृतीय)
11 किमी (18 te 34 वयोगट पुरुष): आकांक्षा शेलार (प्रथम), शीतल एकनाथ सपकाळ (द्वितीय), प्रज्ञा उमाजी पाटोळे (तृतीय)
11 किमी (35 ते 49 वयोगट महिला): स्मिता सचिन शिंदे (प्रथम), दीपाली अंकुश किरदत (द्वितीय), यशोदा मोरे (तृतीय)
11 किमी (50 पासून पुढे वयोगट पुरुष): अनिता जयवंत पाटील (प्रथम), संगीत किशोर उबाळे (द्वितीय), साधना धनावडे (तृतीय)
विजेत्या व विजेत्यांना चारुशीलाराजे पंतप्रतिनिधी, हणमंतराव शिंदे, अमर देशमुख, अनिल जाधव, योगेश फडतरे व शुभम शिंदे यांच्या हस्ते रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पदक देऊन गौरविण्यात आले. इतर पारितोषिकांचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अत्याधुनिक प्रणालीद्वारे प्रत्येक स्पर्धकाच्या धावण्याच्या वेळेची अचूक नोंद घेण्यात आली. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक धावपटूस टी-शर्ट, पदक व प्रमाणपत्र देण्यात आले. धावपटूंच्या सुरक्षिततेसाठी रुग्णवाहिका, डॉक्टरांची उपस्थिती तसेच आठ वॉटर स्टेशन उभारण्यात आली होती. पाणी व एनर्जी ड्रिंक्सची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी औंध शिक्षण मंडळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच राजयोग फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.
