पालघर प्रतिनिधी मिलिंद चुरी
पालघर: डहाणू तालुक्यातील चिंचणी गावाने पुन्हा एकदा राष्ट्रीय क्रीडा नकाशावर आपली ओळख ठळक केली आहे. याच गावातील दोन खेळाडू क्रीडा संघटकांची राष्ट्रीय व राज्य स्तरावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांसाठी निवड झाल्याने हा दुग्धशर्करा योग ठरला आहे.
मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेले तसेच मूळचे चिंचणी गावचे रहिवासी असलेले मांगेला कोळी समाजाचे श्री. जगदीश दवणे यांची ११ ते १५ जानेवारी दरम्यान तेलंगणातील काझीपेठ येथे होणाऱ्या ५८व्या राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय पोलिस पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. सर्वसामान्य कोळी कुटुंबातून राष्ट्रीय स्तरापर्यंत केलेली ही वाटचाल केवळ चिंचणीच नव्हे तर संपूर्ण पालघर जिल्हा व मांगेला कोळी समाजासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
आई मासे विक्री, वडील पारंपरिक मासेमारी अशा अत्यंत साध्या परिस्थितीत वाढलेल्या जगदीश दवणे यांचे शिक्षण बारावीपर्यंतच झाले. मात्र १९९० साली चिंचणी गावात खो-खो खेळाची लागलेली गोडी त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. चपळतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या चिंचणीतील खेळाडूंनी खो-खोमध्ये राज्यस्तरावर दबदबा निर्माण केला. चेतक क्रीडा मंडळाची मुहूर्तमेढ रोवणारे दिपक दवणे व जगदीश दवणे यांच्या मार्गदर्शनाखाली किमान १२५ राज्यस्तरीय खेळाडू घडले. २०२० साली उत्तराखंड येथे झालेल्या इंटरशिप कोचेस कॅम्प मध्येही त्यांनी सहभाग नोंदवला होता. आज भारतीय पोलिस संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी पालघर जिल्ह्यासाठी नवा मानदंड निर्माण केला आहे.
याच चिंचणी गावातील आणखी एक क्रीडा नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर झळकले आहे. पालघर जिल्हा खो-खो असोसिएशनचे सह-कार्यवाह व पंचप्रमुख श्री. दिपक रावरे यांची १६ ते २१ जानेवारी २०२६ दरम्यान केकरी (राजस्थान) येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी (किशोर–किशोरी) महाराष्ट्र किशोर संघाच्या व्यवस्थापकपदी निवड झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून झालेली ही निवड त्यांच्या प्रामाणिक, सातत्यपूर्ण कार्याची पोचपावती मानली जात आहे.
पालघर जिल्ह्यातील अनेक नवोदित पंचांना मार्गदर्शन करून सक्षम पंचांची फळी उभी करण्यासह मोठ्या स्पर्धांचे नियोजन व यशस्वी आयोजन ही त्यांची ओळख आहे. राष्ट्रीय पंच, महाराष्ट्र किशोर संघांचे व्यवस्थापक व निवड समिती सदस्य अशा विविध भूमिका त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. त्यांनी या यशामागे
एकाच गावातील दोन व्यक्तींची राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांसाठी निवड होणे हा चिंचणीसह संपूर्ण पालघर जिल्ह्यासाठी गौरवाचा क्षण ठरला असून क्रीडा क्षेत्रात नव्या चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
