जेजुरी प्रतिनिधी : संदिप रोमण
पुरंदर जेजुरी : फरीदाबाद (हरियाणा) येथे पावरलिफ्टिंग इंडिया आयोजित ३४ व्या क्लासिक व ईक्वीप्ड बेंचप्रेस चॅम्पियनशिप स्पर्धा जानेवारी २०२६ मध्ये पार पडल्या. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे प्रा. डॉ. शिवाजी भिंताडे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत चारही गटांत वर्चस्व सिद्ध केले.
प्रा. डॉ. भिंताडे यांनी क्लासिक बेंचप्रेस प्रकारात सुवर्णपदक पटकावले तसेच ईक्वीप्ड बेंचप्रेस प्रकारातही सुवर्णपदक जिंकून आपली ताकद सिद्ध केली. याचबरोबर दोन्ही प्रकारांत त्यांनी ‘स्ट्रॉंग मॅन’ हा मानाचा किताबही मिळवत स्पर्धेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
या घवघवीत यशामुळे प्रा. डॉ. शिवाजी भिंताडे यांची कतार येथे होणाऱ्या एशियन बेंचप्रेस स्पर्धेसाठी तसेच पोलंड येथे होणाऱ्या जागतिक आंतरराष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या यशामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला मोठा मान मिळाला आहे.
