दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी -दिपक काकरा.
उंबरखेडा येथे अनोखा उपक्रम
जव्हार:- जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून हिंदुजा फाउंडेशन मुंबई आणि बायफ मित्रा यांच्या संयुक्त विद्यमाने जव्हार तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या उंबरखेडा येथे ३५ शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जमिनीचे संवर्धन व सुपीकता राखणे ही काळाची गरज ओळखून जमिनीच्या संवर्धनाविषयी शेतकऱ्यांना माहिती देऊन एक अनोखा उपक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला बायफ मित्रा संस्थेचे दर्शन भोये यांनी जागतिक मृदा दिनाचे महत्व सांगून मृदा संधारणासाठी कश्या प्रकारे मदत करता येईल याची सविस्तर माहिती दिली.त्यामध्ये त्यांनी सांगितले कि,अलीकडच्या काळात झपाट्याने होणारे शहरीकरण,सिमेंट रस्त्यांमुळे मातीची धूप अधिक प्रमाणत वाढत आहे तसेच शेतीमध्ये बदल होऊन अधिक उत्पन्न मिळावे यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करीत असून शहरीकरण आणि उद्योगांसाठी होणारी बेसुमार जंगलतोड तसेच इतर अनेक कारणांमुळे मातीची धूप होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होत असते.
२०१३ साली सुरू झालेल्या जागतिक मृदा दिनाच्या इतिहासाचे संदर्भ देऊन सर्वसामान्यांमध्ये मातीविषयी जागृती निर्माण करणे या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला.जगातील ९५% अन्न मातीतून मिळते तसेच पृथ्वीवरील एकूण सजीवांपैकी २५ टक्के जीव मातीत आश्रय घेतात.फळे,भाज्या आणि धान्यांचा दर्जा जमिनीच्या गुणवत्तेवरच अवलंबून असतो.अलीकडच्या काळात रासायनीक खतामुळे जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे हे ही शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले.शेतकऱ्यांनी शेतात सेंद्रिय शेती करावी त्यामध्ये शेणखत,हिरवळीचे खत,माशाचे खत,गांडूळ खत यांच्या वापर करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.मातीतील ओलावा वाढवणे किंबहुना जास्त काळ टिकवून ठेवणे हे जास्त महत्वाचे असल्याने जल व मृदा संवर्धांच्या कामांना भर देऊन मातीची काळजी घेणे ही काळाची गरज बनली आहे.
