दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
डॉ.राहूल पाटील व सुरेश वरपूडकर आमदारद्वयांची आंदोलन स्थानी भेट व पाठिंबा
परभणी : विभागात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील अधिकारी, अभियंते व कर्मचाऱ्यांच्या वतीने आज सकाळी १० वाजता ७२ तासांच्या संपाला जोमाने सुरुवात झाली आहे. या आंदोलन करण्याचा खासगीकरणाला तीव्र विरोध असून काही मागण्यांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. या संपात परभणी विभागातील ७६५ कर्मचारी व ५ अधिकारी सामील झाले आहेत.
महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपन्यांतील खासगीकरणाचे धोरण बंद करा, अदानीच्या कंपनीला वीज वितरणाचा परवाना देऊ नका, कंत्राटी आऊटसोर्सिंग व सुरक्षा रक्षक कामगारांना कायम करा, तिन्ही कंपन्यांतील रिक्त जागा तातडीने भरा, इनपॅनेलमेंट पध्दतीने कंत्राटीकरण बंद करा, महावितरणचे २०१९ मधील उपकेंद्र कंपनीमार्फत चालवा, उपकेंद्रात कर्मचाऱ्यांची पदस्थापना कायमस्वरुपी करा, या व अशा अनेक मागण्यांसाठीच्या घोषणांचा निनाद करीत या आंदोलन कर्त्यांनी परिसर दणाणून सोडला आहे. दरम्यान या आंदोलनामुळे नागरिकांना त्रास होत असला तरी खासगीकरणाला तीव्र विरोध करीत शिवसेनेचे स्थानिक आमदार डॉ. राहूल पाटील व पाथरी येथील कॉंग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर या दोघांनीही भेट देत आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
दरम्यान या प्रश्नावर आ. राहूल पाटील हे आज दुपारी किंवा त्यानंतर मुंबई येथे राज्याचे उर्जा मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आंदोलन कर्तव्यांची बाजू मांडणार असल्याचे समजले आहे. त्यावेळी त्यांचे समवेत संघटनेचे संघटक प्रसाद शिंगणापूरकर व कार्याध्यक्ष राजन भानुशाली हे उपस्थित राहणार असल्याचे समजले. तद्वत या बोलणीतील निष्कर्षांनंतरच आंदोलनाची पुढील दिशा ठरली जाईल असेही बोलले जात आहे.
असाच बंद गंगाखेड तालुक्यातही सुरु झाला असून तेथे १५० कर्मचारी व ४ अधिकारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे तालुक्यात बहुतांश ठिकाणी वीज बंद असल्याचे समजतेय. याचा सर्वाधिक फटका म्हणजे न्यायालय, तहसील आणि नगरपरिषदेला बसला आहे. त्याशिवाय पाणी पुरवठ्यावरही मोठी गाज पडणार असल्याचे समजते. २९ कंत्राटी कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतल्याचे समजतेय.
