दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : जिल्ह्याला धार्मिक क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व लाभलेले आहे. पाथरी येथे श्री साईबाबांचे जन्मस्थान आहे. नर्सी येथे संत नामदेव महाराज यांचा जन्म झाला आहे.
गंगाखेड येथे संत जनाबाई यांचा व संत भोजलिंग काका यांचा पोहंडूळ येथे जन्म झाला आहे. परभणी तालुका व जिल्ह्यातील बोरी येथे गणिती भास्कराचार्य यांचा जन्म झाला आहे. संत महात्म्यांची जन्मभूमी नि कर्मभूमी म्हणून परभणी जिल्हा सर्वश्रुत आहे. त्याशिवाय
हरिभक्त पारायणकार तथा सांप्रदायिकतेचा वारसा लाभलेल्या याच परभणी शहरात अखिल भारतीय मराठी संत साहित्यांचे अकरावे संमेलन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ जिल्हाच नव्हे तर संपूर्ण देशपातळीवर मराठी साहित्याचा जयजयकार करणारे आणि हरिनामाचा गजर मिरवणारे संत शिरोमणी तथा महान हरिभक्त पारायणकार या निमित्ताने हजारोंच्या संख्येने परभणी नामक पवित्र भूमीत उपस्थित राहाणार आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ५ तारखेला सकाळी १० वाजता या संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत तर समारोप महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत पार पाडला जाणार आहे. फेब्रुवारीच्या ५, ६ आणि ७ या तीन दिवसीय वारकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी परभणीतील संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. तुकाराम महाराज गरुड ठाकूरबुवा हे विराजमान राहाणार आहेत.
पहिल्या दिवशी म्हणजेच फेब्रुवारी घ्या ५ तारखेला सकाळी ७ वा. वैकुंठवासी हे.भ.प.वेदशास्त्रसंपन्न ब्रह्मीभूत रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्या समाधीस्थळी आ.सुरेश वरपूडकर यांच्या हस्ते साहित्य दिंडीचा शुभारंभ होणार आहे. संत तुकाराम महाराज महाविद्यालयाच्या भव्य अशा प्रांगणस्थळी आयोजित समारंभात ही साहित्य दिंडी छत्रपती शिवाजी महाराज चौक, अष्टभूजा देवी मंदिर, गुजरी बाजार, मी. गांधी पार्क, नारायण चाळ, स्टेशन रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून वसमत रस्त्याने आणली जाणार आहे.
या सोहळ्याला उद्घाटन समयी मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांचेबरच केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री अतुल सावे, आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत, मत्स्यव्यवसाय मंत्री संदीपान भूमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आ.मेघना बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे हे लाभले आहेत. तीन दिवसीय चालणाऱ्या या संमेलनात विविध विषयांवर सहा परिसंवाद आणि महत्वपूर्ण चर्चा घडवून आणली जाणार आहे. अनेक साहित्यिक मान्यवर उपस्थित राहून वारकरी संप्रदायाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. पहिले दोन दिवस संध्याकाळी हजारो महिला वारकऱ्यांचा हरिपाठ होणार आहे. तिसऱ्या दिवशी ७ तारखेला संध्याकाळी राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत सोहळ्याचा समारोप केला जाणार आहे. या प्रसंगी विजयसिंह गावित, खा. संजय जाधव, आ. डॉ.राहूल पाटील, आ. बाबाजानी दुर्रानी यांची प्रमुख उपस्थिती लाभली जाणार आहे. वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष विठ्ठल (काकाजी) पाटील, बालासाहेब मोहिते, श्रीकांत ठाकूरबुवा यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशिल आहेत.
संत पाचलेगावकर महाराज, संत रंगनाथ गुरुजी महाराज, संत मोतीराम महाराज फळा, संत मारोतराव महाराज दस्तापूरकर आणि संत अच्युतराव महाराज यांचीही जन्मभूमी व कर्मभूमी म्हणून आस्थेने पाहिले जाणाऱ्या या परभणीला देहू, आळंदी, पंढरपूर सारखीच बाहुगर्दी ओसंडून वाहिली गेल्यास नवल ते कसले ?
