दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/लोहा :- लोहा तालुक्यातील कलंबर ( खुर्द) या गावात बळीराम पाटील व आई जिजाबाई यांच्या पोटी ४ जानेवारी १९५५ रोजी निवृत्तीराव पाटील यांचा जन्म झाला. कलंबरच्या भूमीमध्ये लोकसेवेचा वसा घेऊनच जन्माला आलेले हिमालया सारखे उत्तुंग व्यक्तिमत्व आणि खोल सागराप्रमाणे वैचारिकता हे गुण उपजतच त्यांच्या अंगी होते. बालपणापासूनच चिकाटी आणि जिज्ञासू वृत्ती त्यांच्या अंगी भिणलेली होती. स्वभावातील मनमिळावू वृत्तीमुळे समाजाच्या गळ्यातील ताईत बनले होते.कै. निवृत्तीराव पाटील घोरबांड यांचे प्रा.व मा. शिक्षण कलंबर बु. येथे झाले. पुढील महाविद्यालयीन शिक्षण नांदेड येथील यशवंत महाविद्यालयात झाले प्राथमिक शिक्षणापासूनच त्यांच्या बालमनावर वडिलांचे संस्कार चांगले झालेले होते. त्यांचे वडील गावातील गोरगरिबांना मदत करून,अडचणी सोडवित असतं या गुणांचा त्यांना वारसा मिळाला , शाळेमधूनच त्यांच्या राजकीय जीवनाची जडणघडण झाली.कॉलेज जीवनात अध्यक्ष , वर्ग प्रतिनिधी निवडणुका लढवीत असत .काँग्रेस पक्षाचा विचारसरणीचा तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. शिक्षण घेत असताना गोरगरिबांच्या मुलांचे हाल पाहून त्यांचे मन हेलावत होते . गरिबांचे मुलं शिक्षणापासून वंचित रहात आहेत ,त्यांचे दु:ख त्यांच्या मनाला सारखे बोचत होते. बी.ए. चे शिक्षण पूर्ण करून पुढे जी.डी.सी. व डी.एल. ॲड .ए. डिप्लोमा पूर्ण केला. तरी त्यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देईना. कलंबर परिसरातील गोरगरिबांच्या मुला मुलींना शिक्षणाची सुविधा देण्यासाठी त्यांच्या मनात.” समाज उन्नती शिक्षण संस्था “…स्थापनेचे बीज पेरले गेले. १९८३ मध्ये कलंबर खुर्द ता.लोहा येथे समाज उन्नती शिक्षण संस्था स्थापन केली. मागासवर्गीयांच्या मनात शिक्षणाची आवड निर्माण करावी , खेड्यापाड्यातीलअशिक्षित समाजाच्या मुलांना शिक्षणाची संधी निर्माण करावी ,सर्व स्तरातील मुला-मुलींना शिक्षणातील आवड निर्माण करावी .,शैक्षणिक शाखांचा विस्तार करून शिक्षणाची संधी घराघरापर्यंत आणावी या उद्देशाने समाज उन्नती शिक्षण संस्थेची स्थापना केली. समाज उन्नती शिक्षण संस्थेच्या अंतर्गत संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कलंबर , गणपतराव मोरे विद्यालय किवळा व संत मोतीराम महाराज हायस्कूल कारेगाव या शाळेची स्थापना केली. शाळेसाठी समाजातील तळागाळातील व्यक्तीची मदत घेतली. ” इवलेसे रोपटे लावले या दारी , त्यांचा वेलू गेला गगनावरी ” या संतांच्या उक्तीप्रमाणे समाज उन्नती संस्थेचे जाळे पसरले. शाळेमध्ये गुणवंत शिक्षकांची नेमणूक करून पवित्र ज्ञानदानाचे काम सुरू केले. ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर यांच्या मुलांना शिक्षित करण्याचे शिक्षणाचे पवित्र कार्य हाती घेतले. वडीलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या नावाने कलंबर येथे कै.बळीराम पाटील प्राथमिक शाळा स्थापन केली. एवढ्यावरच न थांबता शिक्षकांना आर्थिक मदत मिळण्यासाठी कै. बळीराम पाटील शिक्षक व शिक्षकेत्तर पतसंस्थेची स्थापना केली. त्यांच्यामध्ये ज्ञान , समाजसेवा व राजकारण यांचा त्रिवेणी संगम होता.त्यांनी आयुष्यभर काँग्रेस पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला. कंधार/ लोहा तालुक्यामध्ये काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ते प्रसिद्ध होते. कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. तसेच काँग्रेस सेवादलाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. तत्कालीन मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेब यांचे समर्थक होते. समाजामध्ये अन्यायाविरुद्ध उठाव करणारे एकमेव व्यक्ती होते. म्हणून त्यांना समाजात मान होता त्यांच्या अंगी धार्मिक वृत्ती होती.समाजातील उपेक्षितांचे आधारस्तंभ होते.कै. निवृत्तीराव पाटील घोरबांड यांना सहकार क्षेत्राचे चांगले ज्ञान होते. शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक त्यांना पाहवत नव्हती म्हणून त्यांनी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवत असत. त्यांच्याकडे संघटन कौशल्य चांगले होते समाजावर गावावर त्यांची पक्कड होती. पंधरा वर्षे गावचे सरपंच पद सांभाळले. सरपंच असताना गावाचा विकास घडवून आणला. पाणी ,लाईट रस्ते , सांडपाण्याची व्यवस्था इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. राजकारणावर त्यांचे वर्चस्व होते त्यांच्या राजकीय वजनापुढे राजसत्ताही नतमस्तक होत होती. कलंबर येथे विद्यापीठीय शिक्षणाची संधी ग्रामीण भागातील मुला मुलींना उपलब्ध करून देण्याचे त्यांचे स्वप्न होते. कलंबर येथे राजीव गांधी सीनियर कॉलेज हा प्रस्ताव औरंगाबाद विद्यापीठाकडे पाठवला होता. पण नियतीचे कार्य , परमेश्वरांचे बेत , काळाचा घाला.हा कुणाला चुकला नाही.कळला नाही.. कळपातील मृगावर वाघाने झडप घालावी तशी काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांना आमच्यातून ५ एप्रिल १९९४ रोजी हिरावून नेले. सीनियर कॉलेजचे स्वप्न अधूरे राहिले. घोरबांड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. समाजाचा प्रमुख दीपस्तंभ हरपला. कै. निवृत्तीराव पाटलांच्या मृत्यूनंतर हिमालया एवढे दुःख बाजूला सारून त्यांच्या पत्नी श्रीमती मुद्रिकाबाई निवृत्तीराव पाटील घोरबांड यांनी समाज उन्नती शिक्षण संस्थेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. साहेबांचे राजीव गांधी सीनियर कॉलेजचे स्वप्न टिळक विद्यापीठाच्या माध्यमातून पूर्ण केले. त्यांच्या कार्याला हातभार लावण्याचे काम त्यांचे सुपुत्र समाज उन्नती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. मारोतीराव पाटील घोरबांड यांनी साहेबांचे अपुर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण केले आहे. कै.निवृत्तीराव पाटील घोरबांड यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
