विरोधकांचा सरकारला इशारा
मागील काही दिवसात राज्यात अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून विरोधकांनी सत्ताधारी महायुतीला घेरण्यास सुरूवात केली आहे.
बीड, परभणी, कल्याणनंतर आता राजगुरूनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
कल्याणमध्ये चिमुकलीवर अत्याचार करून खून केलेल्या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत, तोच राजगुरूनगरमध्येही अशाच प्रकारे ८ आणि ९ वर्षांच्या सख्या चिमुकल्या बहिणींचा निर्घृण खून केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. गेल्या काही दिवसांत हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. परभणीप्रमाणे पोलिसी बळाचा गैरवापर झाला नाही पाहिजे, पण पोलिसांचा गुन्हेगारांवर वचकही राहिला पाहिजे आणि गुन्हेगारांना कायद्याचा धाकही राहिला पाहिजे.. पण तसं होताना आज दिसत नाही आणि आज हे रोखलं नाही तर उद्या ते हाताबाहेर जाऊ शकतं.. म्हणून सरकारने आज प्राधान्याने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून सरकारची पॉवर आणि कायद्याचा धाक काय असतो, हे दाखवून देण्याची गरज आहे. असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बीड मध्ये झालेल्या संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपीला शिक्षा व्हावी, यासाठी शनिवारी सर्वपक्षीय नेत्यांकडून मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगर मध्ये सीआयडीच्या अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होत आहे. त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणाबाबत आता तपासाला वेग आला आहे.
