संसदेच्या अधिवेशनादरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसने चांगलाच गदारोळ घातला. बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान असल्याचे सांगत काँग्रेस आणि विरोधकांनी शाह यांना बडतर्फ करण्याची मागणीही केली.
या मुद्यावरून भाजप बॅकफूटवर असल्याचे दिसत होते. पण दुसऱ्याच दिवशी भाजपने प्रतिहल्ला करण्यास सुरुवात केली. काँग्रेसने बाबासाहेबांचा कधी आणि कसा अपमान केला हे सांगण्याचा प्रयत्न भाजपने केला. आता, काँग्रेसच्या या हल्ल्याला भाजपकडून आणखी प्रत्युत्तर देण्याची रणनीती आखण्यात आली आहे.
दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या बैठकीत राहुल गांधींवर पलटवार करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही त्यास मान्यता दिली आहे. संपूर्ण एनडीए अमित शाहांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसत आहे.
नड्डा यांच्या निवासस्थानी बैठक…
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बुधवारी एनडीएच्या नेत्यांची बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर, जात जनगणना आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर केलेल्या टिप्पणीवर चर्चा झाली. विरोधी पक्ष फेक नेरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले. यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी संविधान आणि डॉ. ब आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा सुरू असलेल्या फेक नेरेटिव्हचा आपण सर्वांनी मिळून मुकाबला करावा. त्यांचे हे षडयंत्र यशस्वी होऊ देऊ नये, असे म्हटले.
एकनाथ शिंदे, अजित पवार अनुपस्थित…
चंद्राबाबू नायडू यांच्याशिवाय नितीश कुमार यांच्या पक्षाकडून केंद्रीय मंत्री राजीव रंजन उर्फ लल्लन सिंह, शिवसेनेकडून प्रतापराव गणपतराव जाधव, जेडीएसकडून एचडी कुमारस्वामी, टीडीपीकडून राममोहन नायडू, माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह आणि केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल, जीतन राम मांझी आणि माजी मंत्री संजय निषाद उपस्थित होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित नव्हते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी संसदेत घडलेला प्रकार सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजप साधणार संधी, काँग्रेसवर जोरदार पलटवार करणार…
भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल शाह यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने रान उठवलं आहे. आता भाजपला या संकटाचा फायदा घेण्याचे ठरवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेसने आंबेडकरांचा वर्षानुवर्षे केलेल्या अपमानाचा प्रत्येक तपशील लोकांसमोर यावा, अशी त्यांची इच्छा आहे. जे मुद्दे काँग्रेसला लपवून ठेवायचे होते आणि समोर येऊ द्यायचे नव्हते, ते सगळे मुद्दे आता भाजप एक एक करून पुढे आणणार आहे. या मुद्यावर काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न भाजपचा असणार आहे. भाजपने प्रदीर्घ प्रचाराची आखणी केल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनाही मैदानात उतरवणार आहेत.
