दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
महाराष्ट्रातील सर्वात मोठी एमआयडीसी असलेले चाकण म्हाळुंगे असल्याने कामगार मोठ्या प्रमाणात आहे
दिवसभर काम करून कंपनीतून घरी जात असलेल्या कामगारांना रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी अडवून लुटणाऱ्या चार जणांच्या टोळक्याला महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. टोळक्याकडून मोबाईल फोन, दुचाकी, ऑटोरिक्षा असा दोन लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कृष्णा सुभाष सौराते (१९, रा. वाघजाईनगर, खेड), भीमराव ज्ञानोबा मुंडे (२१, रा. नाणेकरवाडी, खेड), दीपक विनोद भगत (२४, रा. वाघजाई नगर, खेड), ऋषिकेश अर्जुन माळी (२१, रा. नानेकरवाडी, खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार प्रदीप जाधव आणि धीरज अंबोरे यांचा शोध सुरू आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गीते यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ मार्च रोजी रात्री जितेंद्र वायदंडे हे कंपनीतून घरी जात होते. महाळुंगे येथे त्यांना काही जणांनी अडवून मारहाण केली. तसेच, त्यांचा मोबाईल फोन, दुचाकी चोरून नेली. याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी निष्पन्न करुन चौघांना नाणेकरवाडीतून अटक केली. या कारवाईमुळे महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पाच तर चाकण ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे.
महाळुंगे परिसरात अनेक कंपन्या असून, हजारो कामगार येथे काम करतात. रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी या कामगारांना गाठून त्यांना लुटण्याचा प्रकार आरोपी करत होते. त्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे या घटनांचा तपास करून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. आरोपींचे दोन साथीदार फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
– नितीन गीते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाणे.
