दैनिक चालु वार्ता शिराढोण प्रतिनीधी – गजानन देवने
शिराढोण
:- जिल्हा परिषद अनुकंपा धारकांची अंतीम प्रतीक्षा यादी प्रसारीत करुन 2025 या वर्षाची अनुकंपा पदभारती करण्यात यावी अशी मागणी प्रतीक्षा यादीतील अनुकंपा धारकांनी अनेक वेळा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या कडे निवेदना द्वारे केली आहे परंतु जिल्हा परिषद प्रशासन अनुकंपा भरती बाबत उदासीन असल्याचे व अनुकंपा धारकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.
घरातील कमावता व्यक्ती गमावल्या नंतर कुटुंबाला उदरनिर्वाहा साठी आधार म्हणुन एका व्यक्तीला अनुकंपा तत्वावर शासकीय नोकरी देण्यात येते,काही उमेदवारांचे वय हे बाद होऊन ते प्रतीक्षा यादीतून बाहेर पडण्याची भीती निर्माण झाली आहे,व तसेच काही उमेदवारांचे आई – वडील दोन्हीही हयात नसल्याने ते अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत,
दरवर्षी अनुकंपा नियमानुसार जानेवारी महिन्यात अनुकंपा धारकांची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करुन भरती करण्यात यावी असा नियम आहे परंतु यावर्षी मार्च महिना उलटला तरी भरती तर दुरच आणखी अनुकंपा धारकांची अंतीम प्रतीक्षा यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली नाही तर भरती केंव्हा करण्यात येईल ? हा प्रश्न अधांतरीतच आहे.
गतवर्षी अनुकंपा धारक उपोषणास बसल्या नंतर फेब्रुवारी महिन्यात प्राथमिक प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती व लोकसभा निवडणुक आचार संहितेचे कारण देत अंतीम प्रतीक्षा यादी जून महिन्यामध्ये प्रकाशित करण्यात आली होती.
यावर्षी प्राथमिक प्रतीक्षा यादी दि.04 फेब्रुवारी रोजी संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे मात्र मार्च महिना माध्यावर आला तरी अंतीम प्रतीक्षा अद्याप प्रकाशित करण्यात आलेली नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमा मध्ये जिल्हा परिषद अनुकंपा नियुक्तीतील पदे प्रधान्याने भरण्यात यावी असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हा परिषद प्रशासनास दिले आहेत परंतु मुख्यमंत्र्याच्या या कृती आराखड्यास कराची टोपली दाखवण्याचे काम जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग करत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.
गतवर्षी भरती साठी उशीर झाल्यानंतर काही अनुकंपा धारकांनी खा. अशोक चव्हाण यांच्याकडे त्यांच्या व्यथा मांडल्या नंतर त्यांनी तत्कालीन ग्रामविकास मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याशी समन्वय साधत तात्काळ ऑगस्ट महिन्यामध्ये अनुकंपा भरती करण्यासाठी पुढाकार घेतला होता.
आपल्या धडाकेबाज निर्णय शैलीने ओळखल्या जानाऱ्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल आणि अनुकंपा भरतीशी संबंधित सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार हे याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर भरती करण्यासाठी काय पावले उचलतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
