
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (परतवाडा) :- बोगस क्रमांकाची नंबर प्लेट लावून शहरात वाहने फिरवणाऱ्या तरुणावर कारवाई करून पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.स्विफ्ट डिझायर एमएच १९ सीएफ ४०४५ गाडीचे मालक श्रीमती आशा कुंभारे रा.रामनगर कांडली परतवाडा यांनी पोलीस स्टेशन परतवाडा येथे फिर्याद दिली असता त्यांच्या गाडीच्या नंबरची बोगस नंबर प्लेट बनवून अन्य कोणीतरी वाहन चालवत असल्याचे समजले.ज्यावेळी त्या वाहनावर चालान फाडले जात होते तेव्हा श्रीमती कुंभारे यांना चालानचा संदेश मिळत होता.गेल्या दोन महिन्यांत चार ते पाच वेळा हा प्रकार घडला आहे.अशी माहिती श्रीमती कुंभारे यांनी दिली असून त्यांना आर्थिक दंड भरावा लागत आहे.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन परतवाडा पोलीसांनी या वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात केली.त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी हे वाहन जयस्तंभ चौकाकडून अमरावतीकडे जाताना दिसले.वाहतूक पोलीसांनी त्याचा पाठलाग करून अमरावती रोडवर फातिमा हायस्कूलसमोर पकडले.यामध्ये आरोपीने आपला वकील असल्याचे सांगत पोलीसांशी वाद घातला.मात्र,पोलीसांनी केलेल्या कारवाई दरम्यान संपूर्ण घटना समोर आली.
वाहनाची तपासणी केली असता वाहनाची मूळ आर.सी. दिसले असता त्यावर एमएच ३१ ईए ८३५४ क्रमांकाचे वाहन दिसत असून या वाहनाचा मालक शुभम देविदास वर्धे रा.खेलतपमाळी, सावळी जिल्हा अमरावती असल्याचे ही घटना समोर आली.आरोपीला परतवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.सविस्तर माहितीची विचारपूस केली असता आरोपीने स्वत: बोगस नंबर प्लेट बनवली आणि नंबर प्लेट बनावट असल्याचे माहीत असतानाही ती खरी असल्याचे दाखवून सरकारी व मुळात खर्या मालकाचा व्यवसाय करून फसवणूक करायचा.
३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान आरोपी मनीष कांतीलाल यादव,२८ वर्षे रा.सर्किट हाऊस परिसर,परतवाडा येथे स्विफ्ट डिझायर वाहनावर बोगस नंबर प्लेट लावून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी व मुख्य वाहनमालका सोबत धोकेबाजी केल्या प्रकरणी त्याच्यावर परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणेदार संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय दराडे यांनी आरोपी विरुध्द भादंवि कलम ४१९,४२०,४६५,४६८,४७१ अश्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.