
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर, उद्घाटक डॉ. राजा दीक्षित.
देगलूर: १७ व्या राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलनाचे दि.२४ व २५ फेब्रुवारी २०२३ रोजी मिरज, जि. सांगली येथे आयोजन करण्यात आले असून संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती कामगार मंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी दिली. मंत्रालय मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, डॉ. भवाळकर यांनी लोकसंस्कृतीविषयी विपूल लेखन केले असून मराठी विश्वकोश, मराठी ग्रंथकोश आदी महत्वाच्या कार्यात त्यांचे योगदान आहे. तसेच नाटक, कथासंग्रह, वैचारिक, ललित लेखन, समीक्षात्मक अशा विविध प्रकारची साहित्य निर्मिती त्यांनी केली आहे. त्यामुळे संमेलनाध्यक्ष पदासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित या संमेलनाचे उद्घाटक असून कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद सिंगल मार्गदर्शक तर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे
संमेलनाचे प्रमुख कार्यवाह आहेत. बालगंधर्व नाट्य मंदिर, मिरज, जि. सांगली येथे संमेलन होणार आहे. शुक्रवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात येईल. सकाळी १० वाजता संमेलनाचा उद्घाटन सोहळा होईल. संमेलनाच्या पहिल्या सत्रात चला उद्योजक होऊ या विषयावर डॉ. विठ्ठल कामत (कामत हॉटेल्स गृप लि.), गिरीश चितळे (चितळे उद्योग समुह), हनुमंतराव गायकवाड (भारत विकास गृप इंडिया लि.) या उद्योजकांची प्रकट मुलाखत होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात कामगार चळवळीची कथा आणि व्यथा, मराठी साहित्यात कामगार जिवनाचे चित्र शोधताना, आम्ही का लिहितो?, व्यसनमुक्तीची लढाई या विषयांवर परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर कवींचे कवी संमेलन आणि काव्य मैफिलीचा रसिक प्रक्षेकांना आस्वाद घेता येणार आहे. निमंत्रित तसेच कामगार कवींचा कवी संमेलनात सहभाग असेल. संमेलनात कथाकथनाचे सादरीकरण होणार असून अभिरुप न्यायालय देखील भरवले जाणार आहे. आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार अभिरुप न्यायालयात आरोपीच्या पिंजऱ्यात असतील. संमेलनासाठी इच्छुक कामगारांची नोंदणी करण्यात येत असून अधिक माहितासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळास अथवा नजीकच्या कामगार कल्याण केंद्रास व कार्यलयास भेट द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यापुर्वी कविवर्य नारायण सुर्वे, बाबूराव बागुल, डॉ. आनंद यादव, डॉ.सदा कऱ्हाडे, अरुण साधू, उत्तम तुपे, शिवाजी सावंत, नामदेव ढसाळ, डॉ. विठ्ठल वाघ, मधु मंगेश कर्णिक, प्रा. केशव मेश्राम, डॉ. अनिल अवचट, उत्तम कांबळे, फ. मु. शिंदे, डॉ. रुपा कुलकर्णी, रामदास फुटाणे यांनी कामगार साहित्य संलेमनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.