
दैनिक चालु वार्ता,
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):-इंदापूर विधानसभा निवडणुकीमध्ये सांगली पॅटर्न पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची इंदापुर विधानसभेची उमेदवारी हर्षवर्धन पाटील यांना मिळणार हे आता फिक्स झाले आहे.पंरतु यामुळे इंदापूर विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असणारे प्रवीण माने किंवा आप्पासाहेब जगदाळे हे महाविकासआघाडीमध्ये बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
प्रवीण माने यांच्या कार्यकर्त्यांकडून गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये सांगली पॅटर्नच्या पोस्ट व्हायरल करण्यात येत आहे.आता निर्णय जनतेच्या कोर्टात, इंदापूर मध्ये सांगली पॅटर्न आणि इंदापूरचे आमदार प्रवीण माने हेच होणार असे आशयाचे पोस्ट आणि स्टेटस प्रवीण माने यांच्या कार्यकर्त्यांकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियामध्ये व्हायरल करण्यात येत आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यामध्ये खरंच सांगली पॅटर्नची पुनरुक्ती होणार का? हे पहाणे ही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
यासंदर्भात मात्र प्रवीण माने यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाहीये.