
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी/औंढा : येथील खामगावात कोट्यावधी रुपयांच्या बनावट नोटा व सोने पोलिसांनी जप्त केले असून यात लिप्त एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील ९ जणांच्या शिताफीने झडप घालून मुसक्या आवळल्या गेल्या आहेत तर दोघेजण अद्याप फरार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान त्यांनाही लवकरच पकडले जाईल असा विश्वास पोलीस सुत्रांकडून व्यक्त केला जात आहे.
औंढा नागनाथ पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने टाकलेल्या छाप्यात प्रथम एक महिला संशयित अवस्थेत आढळून आली. वाहनांच्या बाजूला उभी राहून संशयीत टेहळणी करीत होती तर त्याच गाडीत चार पाच अन्य व्यक्ती काही तरी संशयी हालचाली करीत असल्याचे अगोदरच सुगावा लागला होता म्हणून पाळतीवर असलेल्या पोलिसांनी पोलिसी टाक्या दाखवत त्या महिलेला ताब्यात घेऊन दम दिला. त्यामुळे त्या महिलेने गाडीतील त्या पाचजणांकडे अंगूली निर्देश करीत मी पूरती फसली गेल्याचे सांगून तिने हातातील बॅगच उघडून दाखवली त्यावेळी त्या बॅगेत आढळून आलेल्या रुपये ४० लाखांच्या सर्व नोटा बनावट असल्याचे समजले. परिणामी गाडीतील आरोपींनी पोबारा करु नयेत म्हणून त्यांच्यावरही गाडीतच झडप घालून पकडले. त्या सर्वांनाच दरदरीत घाम फुटला होता. त्यामुळे धास्तावलेल्या आरोपीसह ४० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार समजले की, औरंगाबाद येथील एका महिलेची नांदेड व लातूर येथील विनोद शिंदे, केशव वाघमारे, विलास वडजे, सोमनाथ दापके, सुनील जगवार या पाचजणांबरोबर सदर महिलेची ओळख होती. एका संस्थेच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली होती. त्यांनी त्या महिलेस १ लाखाचे तीन लाख रुपये करुन देतो म्हणून सांगितले होते. त्या अमिषाला बळी पडून सदर महिलेने रुपये दहा लाखांची रोकड रोकड सोबत घेऊन बुधवारी थेट नांदेड गाठले होते. तेथे उतरल्यानंतर सदर महिला एका वाहनाने औंढा नागनाथ कडे निघून गेली तर दुसऱ्या वाहनामधून खामगाव येथील अन्य पाच जण रुपये ४० लाखांच्या बनावट नोटा सोबत घेऊन खामगावाहूनऔढ्याकडे आले होते. औंढा येथील उपबाजार समितीच्या कार्यालयाच्या आवारात महिलेने सोबत आणलेले खरे रुपये दहा लाख त्या आरोपींना दिले. त्या बदल्यात गाडीतील त्या व्यक्तींनी ४० लाखांच्या बनावट नोटानी भरलेली बॅग त्या महिलेकडे देऊन त्यांनी तेथून पोबारा केला.औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात गाडी लावून नोटा मोजायला सुरुवात केली होती. त्यावेळी महिला वाहनाबाहेर थांबून कावरे बावरे बघत असतांना दिसून आली. तेच हेरुन पाळतीवरील पोलिसांनी तिला पोलिसी काट्याचा दम दिला. महिलेला घाम फुटलेला बघून त्या पोलिसाने दबा धरुन बसलेले वपोनि.विश्वनाथ झुंजारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अडसर पठाण, जमादार संदीप टाक, रवी हरकळ, अमोल चव्हाण या सर्वांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व त्या महिलेची पूरती हजेरी व झाडाझडती घेतली. त्यामुळे गाडीतील सर्वांनाच कमालीचा घाम फुटला. त्यामुळे पोलिसांना आरोपींचा बळावलेला संशय पूरता ध्यानी आला. त्यावेळी सदर महिलेने आपण पूरते फसले गेल्याचे सांगत जवळ असलेली रुपये ४० लाखांची बॅग उघडून पोलिसांना दाखवली. घाबरलेल्या आरोपींना पोबारा होण्या अगोदरच त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांनी यश मिळवले. त्यानंतर आरोपींना पोलीस ठाण्यात आणले व घडलेल्या प्रकरणाची इत्यंभूत कल्पना पोलीस अधीक्षक जी. श्रीधर , अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील देताच त्यांनी संपूर्ण मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्हा स्थानांतील सर्व नाकेबंदी करण्याचे आदेश देण्याचे सूचित केले. त्याच. नाका बंदीमध्ये पोलिसांनी वाहनांसह परमेश्वर जांगीड, लग्न गोपाल बजाज, राहूल चंदुसिंग ठाकूर (रा. सर्वजण खामगाव) यांना झडप घालून ताब्यात घेतले. व्हिडीओ कॉलिंग वरुन त्यांची ओळख परेड झाल्यानंतर त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्यांच्या घरात रुपये ७५ हजारांची बनावट रोकड आणि कांही सोने मिळाले ते सुद्धा बनावटी असल्याचे समजले. दोन फेब्रुवारी ला खामगाव पोलिसांकडून ताब्यात घेऊन पोलिस पथकाने औंढा येथे आणले व गुन्ह्याची नोंद केली. एकूण ११ आरोपी यात लिप्त असून पैकी ९ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत तर फरार दोघाजणांचा कसून शोध घेतला जात आहे. शिवाय रुपये दहा लाखांच्या खऱ्या नोटांचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान या बनावट नोटा प्रकरणी घ्या टोळीत लातूर कॉंग्रेसच्या एका माजी नगरसेवकाचाही सहभाग असल्याने लातूर शहर व परिसरात सर्वत्र प्रचंड खळबळ माजली आहे. हा माजी नगरसेवकच या टोळीचा म्होरक्या असल्याची वदंता असून सखोल चौकशीअंती वास्तव ते काय हे समोर येऊ शकेलच. दरम्यान या बनावट नोटांचे अपहार प्रकरणी आणखी कुठे कुठे घडवले असावे याचाही असून शोध घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जप्त केलेल्या ह्या नोटा लहान मुलांच्या बॅंक खेळण्यातील असून प्रत्येक बंगल्याच्या वर खाली खऱ्या नोटा लावून आतमध्ये सर्व नोटा बनावट लावल्याचे उघड झाले आहे. बनावट नोटांचे हे घबाड उजागर झाल्याने ज्यांनी ज्यांनी या मागील कालावधीत पैशांचे मोठे मोठे व्यवहार केले आहेत, त्या सर्वांमध्ये कमालीची घबराट निर्माण झाली आहे. एवढेच नाही तर आपण स्वीकारलेल्या नोटा खऱ्या की खोट्या यासाठी सर्वांचीच घाबरगुंडी उडाली असून त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या सर्वांचीच धावपळ सुरु असल्याचे बोलले जात आहे.