
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- महावितरण कडून गेल्या १० महिन्यांत १ लाख ४ हजार ७०९ कृषी पंपांची नवीन वीज जोडणी शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.त्यापैकी ५४ हजार वीज जोडण्या गेल्या तीन महिन्यांतच देण्यात आल्या.हा वेग आणखी वाढवून येत्या मार्च महिन्यापर्यंत जास्तीत जास्त कृषी पंपांना नवीन वीज जोडणी देण्याची योजना आखण्यात आली आहे.त्यानुसार अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील कृषीपंपांची प्रलंबित वीज जोडणी तातडीने देण्यात यावी,अशा सूचना महावितरणचे संचालक संजय ताकसाडे यांनी काल झालेल्या बैठकीत दिले.क्षेत्रीय कार्यालयाला विविध योजनांतून निधीही उपलब्ध करून दिला आहे.त्यामुळे नवीन कनेक्शन जोडण्यास कोणतीही अडचण येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील कृषी पंपांना नवीन वीज जोडण्या देण्याबाबत संचालक ताकसांडे यांनी अमरावती परिमंडळाची आढावा बैठक घेतली.यावेळी नागपूर प्रादेशिक संचालक सुहास रंगारी,अमरावती परिमंडळाचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी उपस्थित होते.संचालक ताकसांडे म्हणाले की,मार्च २०२२ पर्यंत प्रलंबित असलेल्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना येत्या मार्च महिन्यापर्यंत नवीन वीज जोडणी देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.त्यानुसार या सर्व वीज जोडण्या देण्यासाठी महावितरणने विविध योजनांचा समावेश असलेला आराखडा तयार केला असून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासनाने युद्धपातळीवर कामही सुरू केले आहे.अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात मार्च २०२२ पर्यंत पैसे भरल्यानंतर ३१ मार्चपर्यंत प्रलंबित कृषीपंपांची कामे पूर्ण केली जातील.नवीन वीज जोडणी देण्याचे उद्दिष्ट असून,त्यासाठी महावितरणचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांनी कृषी पंपाच्या नवीन वीज जोडणीच्या कामाला गती द्यावी.यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.असेही संचालक ताकसांडे यांनी स्पष्ट केले.येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील १७०० तर अमरावती जिल्ह्यातील १६५० कृषी पंपांना १००० रुपये भरून नवीन वीज जोडणी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.ताकसांडे यांनी बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांवर चांगलेच ताशेरे ओढले.प्रलंबित वीजजोडणी कृषी पंपांना जोडण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय आणि ठेकेदार एजन्सीच्या कामाची मुख्यालयाकडून दैनंदिन दखल घेतली जात असल्याचे ताकसांडे यांनी स्पष्ट केले.