
दै.चालु वार्ता प्रतिनिधी मंठा
सुरेश ज्ञा.दवणे
मंठा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. कर्मचाऱ्यांच्या मंजूर पदांपैकी अनेक पदे रिक्त असल्याने तेथील आरोग्य सेवा कोलमडली आहे. परिणामी मंठा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आरोग्यसेवाच सलाईनवर असल्याने उपचारासाठी जायचे कुठे? असा प्रश्न स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
मंठा तालुक्यात एकूण चार प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. एकूण ८८ कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असताना केवळ ३६ कर्मचारी कार्यरत असून, ५२पदे रिक्त आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडण्यात आलेल्या गावातील नागरिकांच्या संख्येच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. याचा त्रास रुग्णांना होत असून,उपचारासाठी तासनतास आरोग्यकेंद्रात ताटकळत उभे राहावे लागत आहे. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविकांचे पद रिक्त असल्याने व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे महिलांची कुचंबणा होत आहे. मात्र, याकडे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे रिक्त असलेली पदे तत्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे…गोळ्या औषधांचाही तुटवडा
प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात गोळ्या, औषधांचाही तुटवडा जाणवत आहे. परिणामी नागरिकांना बाहेरुन औषध खरेदी करण्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याची ओरड नागरिकांत होत आहे. मंठा तालुक्यांतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त असलेल्या पदांची माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे. पदभरतीबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा सुरु आहे.
डॉ. सचिन शेकडे , तालुका वैद्यकीय अधिकारी,मंठा चौकट मुख्यालई न थांबता रात्रपाळीत अधिकारीच असतात गायब
प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास आरोग्य सेवा मिळणे अपेक्षित असते. मात्र, अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणावरून अप-डाऊन करीत असल्याने रात्रीच्या वेळी निवासी राहत नाहीत. परिणामी नागरिकांना २४ तास सेवा देण्याच्या शासनाच्या उद्देशालाच कर्मचाऱ्यांकडून हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. याकडे वरीष्ठाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे…अशी आहे आरोग्य केंद्रातील सध्याची स्थिती
मंठा तालुक्यातील पाटोदा आरोग्य केंद्रात १८ पदे मंजूर आहेत. अकरा कार्यरत आहेत. तर सात पदे रिक्त आहेत. ढोकसाळ येथे १८ पदे मंजूर, सात कार्यरत ११ रिक्त आहेत. तळणी येथे १५ मंजूर पदे कार्यरतसहा रिक्त तर नऊ पदे रिक्त,दहिफळ खंदारे येथे १६पदे मंजूर असून कार्यरत ०३तर तेरा पदे रिक्त आहेत. परंतु, ढोकसाळ व दहिफळ येथील रिक्त पदांमुळे रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. त्यामुळी ही रिक्त पदे त्वरीत भरण्याची मागणी आहे…कोट्यवधींच्या वसाहती धूळखात
आरोग्य विभागाने नागरिकांच्या आरोग्यासाठी ४ प्राथमिक आरोग्य केंद्र उभारली आहे.या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीबरोबरच डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून वसाहती निर्माण केल्या आहेत. परंतु, असे असतानाही काही ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने या कोट्यवधीच्या इमारती धूळखात असल्याचे दिसन येत आहे.