
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी
संतोष मनधरणे
नांदेड ( देगलूर): एकीकडे केंद्र व राज्य सरकार म्हणत आहे ‘शेतकरी जगला तर देश जगेल’ पण ऐन खरीप हंगामात देगलूर शहरातील व तालुक्यातील कृषी केंद्र चालक म्हणत आहेत की बियाणे घेतले तर खत मिळेल. या प्रकारामुळे शेतकरी हताश झाला असून, पेरणी कशी करावी, याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. खरिपाच्या तोंडावर खतांचे लिंकिंग करून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे दिसून येत आहे.
खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन ते तीन बैठका कृषी केंद्र वेठीस धरू नका, अशा सूचना दिल्या. पण बैठकीत असेपर्यंत कृषी केंद्र चालकांनी सर्व सूचना मान्य केल्या. आता ही दुकानदार मंडळी खते, बियाणांसाठी लिंकिंगलावून शेतकऱ्यांना एक प्रकारे वेठीस धरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी जावे कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सद्यःस्थितीत देगलूर शहर व तालुक्यात १५० ते २०० बियाणे व खतांची दुकाने कार्यरत आहेत. यात काही परवानाधारक आहेत, तर काही दुकानदारांकडे परवानाही नाही. या दुकानदारांची तपासणी कृषी चालकांच्या घेऊन शेतकऱ्यांना विभागाने करणे आवश्यक आहे. गतवर्षी जी परिस्थिती निर्माण झाली होती, तीच परिस्थिती याहीवर्षी पाहावयास मिळत आहे. खरे पाहिले तर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकानदारांच्या या निर्णयाला वेळीच आवर घालण्यासाठी पथके बाजारपेठेत पाठवायला पाहिजेत. पण तसे न करता कृषी विभाग सध्या गप्प बसला आहे. दोन दिवसांत पाऊस पडेल, आणखी एक दोन दिवसांत जोरदार पाऊस पडेल या आशेने शेतकरी बियाणे, खते विकत घेण्यासाठी कृषी दुकानांत गर्दी करीत आहेत. पण कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून लिंकिंग करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्या आरोप काही शेतकऱ्यांकडुन केला जात आहे
चौकटीत
फिरते पथक आहे कुठे ?
खरीप हंगाम सुरू झाला असून पेरणीसाठी बियाणे, खते, औषधी खरेदी करणे सुरू झाले आहे. या अनुषंगाने कृषी विभागाने पथके तयार केली आहेत. मात्र, ही पथके नावापुरतेच असल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे. कृषी केंद्रांना भेटी देणे गरजेच असतानाही तालुका कृषी अधिकारी भेट देत नसल्याचे दिसून येत नाही. शेतकऱ्यांची लूट होत असताना अशी पथके काय कामाची ? कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेली पथके आहेत तरी कुठे? असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे