
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी
लेंडी धरणासाठी आपल सर्वस्व गमावलेल्या धरणग्रस्तांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असतानाच एका नव्या समस्येने तोंड आ वासले आहे. रावणगाव पुनर्वसित नागरिक रस्ते व पाणी या सुविधांसाठी प्रशासनाकडे लढत असताना विजेच्या एका नव्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याची खंत प्रकल्पग्रस्त नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. कसेबसे जुन्या गावातून नागरिक पुनर्वसन रावणगाव येथे विस्थापित होत असतानाच राजू वाघमारे हा प्रकल्पग्रस्ताकडून कार्यवाहीच्या नावावर आर्थिक लूट करीत असल्याची चर्चा संबंध पुनर्वसित भागांमध्ये केली जात आहे. अनेकांनी कोटेशन भरूनही त्यांना मीटर मिळाले नाही. मात्र त्यांचे बिल अचानकपणे दिले जात आहे. वीज बिलाशिवाय कसे कळणार की आपणास बिल किती आले आहे? हा मोठा प्रश्न आहे. याशिवाय अनेकांची वीज बिल वीस ते तीस हजारांच्या वर दाखवली जात आहेत. वीस हजारांचे बिल होईपर्यंत संबंधित लाईनमन झोपला असावा का? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. शिवाय यात एकदाच एवढी रक्कम भरावी लागणार अन्यथा आपले वीज कनेक्शन कापले जाईल अशी धमकी देऊन नागरिकात दहशत निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयास लाईनमन राजू वाघमारे याच्याद्वारे होत आहे. लोकांना विश्वासात घेऊन मीटर घेण्यासंबंधी समुपदेशन करण्याऐवजी धमकी वजा सूचनांचा वापर करीत असल्याने समस्त धरणग्रस्त नागरिक लाईनमन राजू वाघमारे यास वैतागली आहेत. तसेच एका नव्या समस्याला तोंड द्यावे लागत असल्याने विस्थापितांचा प्रश्न गंभीर बनला आहे. नुकतेच राजू वाघमारे यास निलंबित करण्यासंदर्भात निवेदन एडवोकेट इर्शाद पटेल यांनी दिला होता. यावर विचारणा केली असता मार्च एंड असल्याने चौकशी करता आली नाही. लवकरच चौकशी करून कार्यवाही बाबत विचार केला जाईल. असे उत्तर कार्यकारी अभियंता उपविभाग देगलूर यांच्याकडून प्राप्त झाले आहे. शिवाय बंद असलेल्या डीपी बाबत बोलताना लगेच दुसऱ्या दिवशी माणूस पाठवला होता. चालू झाले नाही का? असा अनभिज्ञ प्रश्न कार्यकारी अभियंताकडून प्राप्त झाले आहे. एकंदरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही आदेश पाळले जात नसल्याचे यावरून सिद्ध होत आहे. तसेच संबंधितास निलंबित करण्यास एवढे कारण पुरेसे असल्याने तात्काळ कार्यवाही करावी. अशा मागणीने आता जोर धरला आहे.