
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी-दत्तात्रय कराळे
परभणी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे साडे सहा लाखांच्या गुटख्यासह एकूण साडे चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार परभणी स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई पाथरी येथे अत्यंत शिताफीने केली असल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.
परभणी शहर व जिल्ह्यातील तालुका पातळीवर मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी व विक्रीही सर्रासपणे होत असल्याचे दिसून येत आहे. मागावर असलेली पोलीस यंत्रणा लहान लहान कारवाया करीत असतात तरीही या प्रकारात कमी होत नसल्याचे जाणवते असते. निर्ढावलेले तस्करी बहाद्दर पोलिसांच्या कारवाईला सुध्दा जुमानत नसावेत म्हणूनच की काय म्हणून गुटखा तस्करीचा हा गोरख धंदा तेजीने वाढल्याचे दृष्टीक्षेपात येतो आहे. त्याचाच परिपाक म्हणून पाथरीत हा तस्करीसाठी जाणारा गुटखा पोलीस कारवाईत आढळून आला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने परभणी स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याचे दिसून येत आहे. ज्यामध्ये सुमारे सहा लाख ४३ हजार ५०० रुपयांचा गुटखा व रुपये आठ लाखांचे वाहन मिळून एकूण १४ लाख, ४३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. कारवाई तशी धाडशी असली तरी कठोर कारवाईचा बडगा उगारल्या शिवाय जोमाने चालणारी तस्करी बंद होऊ शकणार नाही अन्यथा ती अधिकच उफाळली जाईल यात शंकाच नसावी असेही बोलले जाते स्वाभाविक आहे.