
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर:तरुणांना अर्धनग्न करुन पोलिसांकडून पट्ट्याने बेदम मारहाण होत असल्याचा कथित व्हिडीओ नांदेड जिल्ह्यातील सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले होते. तर याच चौकशीनंतर अखेर इस्लापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांना निलंबित करण्यात आले आहे. रविवारी (12 फेब्रुवारी) रोजी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हा आदेश पारीत केला. तर या सर्व प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचं देखील पोलीस अधीक्षक कोकाटे म्हणाले आहेत. मारहाण झालेले गोरक्षक नसल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. तरुणांना मारहाण करणे चुकीचे असल्याच्या कारणाने निलंबनाची कारवाई करण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील तरुणांना पोलीस ठाण्यात एका अधिकाऱ्याकडून बेदम मारहाण करण्यात येत असल्याचा कथित व्हिडीओ समोर आला होता. ज्यात हा पोलीस अधिकारी तरुणांना अर्धनग्न करुन त्यांना पट्ट्याने (पोलीस सुंदरी) मारहाण करताना पाहायला मिळत आहे. याचवेळी आजूबाजूला अनेकजण बसल्याचे पाहायला मिळत असल्याचे दिसून येत आहे. तर या मारहाणीचा व्हिडीओ नांदेड जिल्ह्यातील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान याबाबत माध्यमांमध्ये बातम्या येताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी याची गंभीर दखल घेतली होती.
अर्धनग्न तरुणास पोलीस मारहाण करत असल्याच्या व्हिडीओ लगेचच व्हायरल झाला होता. या कथित व्हिडीओची पोलीस प्रशासनाकडून, चौकशी सुरु करण्यात आली होती. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांना पोलीस नियंत्रण कक्ष येथे संलग्न करण्यात आले होते. तर 12 फेब्रुवारी रोजी चौकशी पूर्ण झाल्यानंतर शेवाळे यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी काढले आहे. तसेच निलंबन काळात शेवाळे यांना मुख्यालयी सकाळ आणि संध्याकाळ रोज हजेरी लावणे बंधनकारक केले असून, परवानगी शिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असेही निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मारहाण करण्यात आलेले तरुण गौरक्षक नाहीत…
अवैधरित्या गायींची तस्करी करणाऱ्या वाहनांना अडवण्याचा प्रयत्न विहिंपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा राग मनात ठेवून ही मारहाण करण्यात आल्याचा दावा विहिंपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. याप्रकरणी राज्याच्या गृहमंत्र्यांना देखील पत्र लिहिण्यात आल्याचं विहिंपकडून सांगण्यात आलं. मात्र मारहाण करण्यात आलेले तरुण गौरक्षक नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र व्हिडीओत पोलीस अधिकारी रघुनाथ शेवाळे मारहाण करत दिसत असल्याने, त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला असल्याच पोलीस अधीक्षक कोकाटे म्हणाले आहे.